लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवरील उपचारासाठी २२ जुलैपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी या रुग्णालयात ३२० रुग्ण दाखल झाले होते. तर ३२ जण विविध वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून रुग्णालय पूर्वीप्रमाणे नॉन कोविड करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना रुग्णांवर मोहाडी येथील रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता पहिल्या रुग्णाला केस पेपर देण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत ओपीडीत २२० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सातपर्यंत हा आकडा ३२०वर गेला होता. रुग्णालयात सर्व विभागात मिळून ३८६ ऑक्सिजन बेड आहेत.
सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सर्व रुग्णालयाच्या आवारात आणि ओपीडीच्या सर्व विभागात पाहणी केली. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावीत, डॉ. विलास मालकर, डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २० मार्चपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोरोना रुग्णांसाठी घोषित करण्यात आले. पहिली लाट ओसरल्यानंतर १७ डिसेंबर २०२० रोजी नॉनकोविड करण्यात आले होते.
कोट - कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांची गैरसोय होत होती. २१ विविध विभागांद्वारे वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाविरहित सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार झाले आहे. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता.