लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपात सत्ताधारी भाजपने वर्षभरापुर्वी स्थापन केलेल्या विविध विशेष समित्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या अकरा समित्या बरखास्त करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेत ठेवण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षभरासाठी नव्याने समित्यांचे गठण करण्यात येणार आहे.
मनपात सत्ता आल्यानंतर सत्ताधारी भाजपने तब्बल अकरा वर्षानंतर मनपात विशेष समित्या गठीत केल्या होत्या. भाजपा ५७, शिवसेना १५ व एमआयएमचे ३ असे पक्षीय बलाबल आहे. या विशेष समित्यांच्या निवडीदरम्यान शिवसेनेने सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे सर्व अकरा समित्यांवर सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांची वर्णी लागली होती. विशेष समित्यांचे गठन करताना पक्षीय संख्याबळानुसार सदस्यांची नियुक्ती करण्यात येतात. दरम्यान, गेल्यावेळेस समित्यांवर जाण्यास नकार देणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.