लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फुले मार्केट भागात अनेक विक्रेते दुपारीदेखील व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यानंतर मनपा प्रशासनाने फुले मार्केटचे सर्व प्रवेशद्वार बंद करून व्यवसाय करण्यास विक्रेत्यांना मज्जाव केला होता. मात्र फुले मार्केट बंद होताच विक्रेत्यांनी आता शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील रस्त्यालगत व्यवसाय सुरू केला आहे. मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक व विक्रेत्यांमध्ये दिवसभर पाठशिवणीचा खेळ सुरू होता.
जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाकडून बाजारपेठांमधील नेहमी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत तसेच सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना व्यवसाय करण्यास तसेच भाजीपाला विक्रेत्यांना निश्चित केलेल्या जागांवरच व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. मात्र असे असताना शहरातील दुकानदार, रस्त्यांवर विक्री करणारे विक्रेते यांच्याकडून नियमांची पायमल्ली होत आहे. शहरातील फुले मार्केट भागात अनेक विक्रेते दुकाने थाटत असल्याने, शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने फुले मार्केटमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. मात्र फुले मार्केटमधील रस्ते बंद केल्यानंतर विक्रेत्यांनी आता थेट रस्त्यावर येऊनच व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली. मंगळवारी शहरातील बळीराम पेठ, टॉवर चौक, सुभाष चौक व शिवाजी रोड परिसरात अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती तसेच सकाळी ११ वाजेनंतरदेखील या ठिकाणी गर्दी कायम असल्याचे चित्र आढळून आले.
मनपाचे पथक येताच पळापळ आणि गोंधळ
सकाळी ११ वाजेनंतरदेखील मुख्य बाजारपेठ परिसरात विक्रेत्यांची दुकाने थाटलेली होती तसेच या ठिकाणी नागरिकांचीदेखील गर्दी झालेली होती. याबाबत मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच मनपाचे पथक मुख्य बाजार पेठ भागात दाखल झाले. मनपाचे पथक येताच बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. अनेक विक्रेत्यांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, तर काही विक्रेत्यांनी आपला सामान जमा करून पळापळ सुरू केली. मनपा कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांवर थेट कारवाई करत माल जप्त केला. यावेळी १९ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
बजरंग बोगदा परिसरात पुन्हा विक्रेत्यांची गर्दी
बजरंग बोगदा परिसरात महापालिकेच्या पथकाने गेल्या आठवड्यात कारवाई करून या ठिकाणचा बाजार उठवला होता. मात्र आठवड्याभरातच या भागात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपासून या भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती तसेच नागरिकांनीदेखील भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यासह शहरातील महाबळ, मेहरूण, खोटे नगर या भागातदेखील भाजीपाल्याचा बाजार भरत आहे. विशेषकरून सायंकाळच्या वेळेस सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही नियमांची अंमलबजावणी न करताच या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी मात्र शहरातील मुख्य बाजारपेठ भागातच ठाण मांडून बसले आहेत. शहरातील उपनगर भागातदेखील मनपा पथकाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.