भानामतीचा प्रकार सिध्द करून दाखवा, अंनिसने जाहीर केले २१ लाखांचे बक्षीस
सुनील पाटील
जळगाव : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. भानामतीच्या संशयावरून चंद्रपूर जिल्ह्यात दलित समाजातील महिला व पुरुषांना बांधून ठेवत जबर मारहाण करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. भानामती, जादूटोणा, करणी हे निव्वळ ढोंग आहे. जळगाव जिल्ह्यात तर आता लिंबू मंतरुन घरावर फेकण्याचे प्रकार वाढले आहे. दर आठवड्याला अशी प्रकरणे अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडे येत असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस. कट्यारे यांनी ‘लोकमत’ला दिली. गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्ह्यात अशी शेकडो प्रकरणे हाताळली आहेत. गुन्हे मात्र दाखल झालेले नाहीत. भानामती, करणी, जादूटोणा या सर्व बाबी फसवणुकीच्या असल्याचे ‘अंनिस’ने सिद्ध केले आहे. आपल्यावरील संकट दुसऱ्यावर जावे यासाठी लिंबू मंतरुन तो शेजारच्या घरावर किंवा धाब्यावर फेकला जातो. योगेश्वरनगर, पिंप्राळा व शिवाजी नगरात असे तीन प्रकार काही दिवसात समोर आल्याचे प्रा.कट्यारे यांनी सांगितले.
२०१३ मध्ये झाला कायदा.....
जादूटोणा, भानामती, करणी यासह अन्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबींवर आळा घालण्यासाठी २०१३ मध्ये कायदा झाला. एकूण १२ कलमांचा हा कायदा आहे. भूत उतरविणे, साप चावल्यानंतर उपचार न करता मंत्रातून विष उतरविणे, आर्थिक प्राप्तीसाठी एक प्रकारची दहशत निर्माण करणे यावर आळा घालण्यासाठी बारा कलमांचा हा कायदा आहे. तरीही राज्यांमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना घडत आहेत.
गुन्हे दाखल नाही, मात्र तक्रारींची संख्या अधिक
जादूटोणा, भानामती, करणी यासही इतर अंधश्रध्देबाबत कायदा असला तरी जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवर एकही प्रकरण आलेले नाही. परंतु अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडे शेकडोच्या संख्येने दहा वर्षात तक्रारी आलेल्या आहेत. कधी कधी तक्रारींचा ओघ मोठा असतो तर कधी कधी तर तक्रारीच नसतात. फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यावरच नागरिक समितीकडे येतात.
भानामती, करणी म्हणजे नेमके काय?
१) आपल्या कुटुंबावर आलेली बला दुसऱ्यावर पलटवणे म्हणजे आपल्यावर आलेले संकट निवारण्यासाठी पूजाअर्चा करून किंवा गंडे-दोरे ताईत, मंतरलेले लिंबू नारळ, वेळप्रसंगी होमहवन करून दुसऱ्यावर उलटवण्याचा प्रकार म्हणजे भानामती किंवा करणी. यासारखी काळी जादू वापरण्याची पद्धत बुवा बाबा,भगत मांत्रिक सांगत असतात. ते स्वतः गुढी लावतात, ध्यानसाधना करण्याचा निरर्थक पूजा बांधतात, भक्तांना आकर्षित केले जाते. भक्त आकृष्ट होतात. त्यांचा विश्वास संपादन करतात, यात प्रामुख्याने स्रीयांचा समावेश जास्त राहतो. आपल्या कुटुंबातील बला दुसऱ्यावर उलटवण्यासाठी शेजारच्या काकू पण सहभागी होतात. हळूहळू हे लोण पसरले जाते.
२) काहीच उपाय होत नाही किंवा काहींच्या कुटुंबातील पुरुषांचा या गोष्टीवर विश्वास नसतो, काहींची फसवणूक होते, मग यातील काही सदस्य अंनिसकडे तक्रार करतात. आता आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही प्रथम पीडितांना सांगतो की, भानामती, करणी असले प्रकार नसतात. ते सिद्ध करा आणि आमचं एकवीस लाख रुपये बक्षीस मिळवण्याचे आव्हान स्वीकारा, पण दुर्दैवाने आजपावेतो हे आव्हान कोणीही स्वीकारायला पुढे आले नाहीत. पीडितांचे प्रबोधन करताना अशा प्रकारची काळी जादू नसतेच. फेकलेल्या वस्तू बिनधास्तपणे उचला, घरी आणा, त्यांचा वापर करा, लिंबू असेल तर सरबत करा. काहीच होणार नाही याची शाश्वती व हमी अंनिस देत आहे.
कोट...
लोकांमध्ये अंधश्रध्दा खूप आहे. काही भोंदू लोकांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतात. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कारवाई केल्यास असे प्रकार घडणार नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती या अनुषंगाने काम करीत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या लिंबू मंतरुन फेकण्याचे प्रकार वाढले आहेत. आठवड्यातून किमात एक तक्रार येते. आमच्याकडून नागरिकांचे समुपदेशन केले जाते.
-प्रा.डी.एस. कट्यारे
जिल्हा कार्याध्यक्ष , अंधश्रद्धा निर्मूलन समिती