जळगाव : संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात भारत बंदला जळगाव शहरात फारसा प्रतिसाद लाभला नाही. मनपाच्या गाळेधारकांनीही आज बंद पुकारला होता. त्यामुळे काही दुकाने बंद होती. त्याव्यतिरिक्त इतर व्यवहार मात्र सुरळीत होते. काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी काही तास उपोषण केले. तर संयुक्त किसान मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदनदेखील दिले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजीदेखील केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेला धान्य आणि भाजी बाजार सुरळीत सुरू होता. दिवसभर धान्य मार्केटमध्ये काम सुरू होते. तसेच सकाळी लिलावदेखील झाले. त्यासोबतच भाजी बाजारात देखील सकाळचे लिलाव नियमित झाले.