जळगाव : शनीपेठतून न्यामत खान चाँद खान (वय-४२) यांच्या मालकीची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच १९ बी.आर ३९५५) चोरट्यांनी १७ डिसेंबर रोजी रात्री लांबविली आहे. शोधाशोध करूनही मिळून न आल्याने खान यांनी सोमवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास नरेंद्र बागुले करीत आहे.
२२ वर्षापासून फरार असलेला आरोपी अटकेत
जळगाव : अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २२ वर्षापासून फरार असलेल्या सुरजितसिंग तारासिंग भोंड (रा.धरणगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जळगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. भोंड हा १९९९ पासून फरार होता. त्याला न्यायालयाने फरार घोषीत केले होते. परभणी येथून जळगावात येत असतानाच त्याला पकडण्यात आले. अनिल जाधव, दीपक शिंदे व अशरफ शेख यांनी ही कारवाई केली.
गुरुनानक नगरातील वाद, संशयितांना जामीन
जळगाव ; गुरुनानक नगरात दोन गटात उफाळलेल्या वादात शनी पेठ पोलिसांनी ११ जणांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मधुकर छोटू गोयर (५७ रा. गुरूनानक नगर) व अनिता मनोज चव्हाण (वय ४५ रा. गुरूनानक नगर) यांनी परस्परविरोधी तक्रार दिल्याने दोन्ही गटाच्या ११ जणांविरुध्द गुन्हे दाखल झाले होते. १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता हा वाद उफाळला होता. यात चार जण जखमी झाले होते तर दुचाकीची तोडफोड झाली होती.