संपर्कप्रमुख संजय सावंत यांची माहिती : भाजपतील अंतर्गत गटबाजीचा फायदा होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- मनपा महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार असून, भाजपमध्ये इच्छुकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. तसेच महापौर, उपमहापौरपदावरून भाजपत चार गट तयार झाले आहेत. भाजपतील या अंतर्गत गटबाजीचा फायदा शिवसेनेकडून घेण्याचा प्रयत्न केला जात असून, महापौर व उपमहापौरपदाच्या होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना महापौरपदासाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली आहे.
मनपात ७५ पैकी ५७ नगरसेवक भाजपचे असून, शिवसेनेचे केवळ १५ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी सेनेला २३ नगरसेवकांची गरज आहे. त्यात एमआयएमचा पाठिंबा मिळाला तर २० नगरसेवकांची गरज सेनेला लागणार आहे. मात्र, हे जरी अशक्य वाटत असले तरी सेनेकडून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिला जाणार आहे.
भाजपतील नाराजीचा फायदा सेनेला कितपत होणार
महापौरपदावरून भाजपत सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच भाजपत एकूण चार गट तयार झाले आहेत. अनेकांकडून भाजपतील निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर महापौरपदाचे आश्वासन दिल्याने बाहेरून पक्षात आलेल्यांकडून देखील पक्ष नेतृत्वावर दबाव टाकला जात आहे. तर काही नगरसेवकांकडून जातीनिहाय गणिते मांडून काही महापौरपदावर दावा केला जात आहे. तर विद्यमान महापौर भारती सोनवणे यांना पुन्हा मुदतवाढ देण्यासाठी काही नगरसेवकांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपतील गटबाजी निवडणुकीपर्यंत वाढत गेली तर भाजपतील गटबाजीचा फायदा सेनेला कितपत होईल, यावर सेनेचे गणित ठरणार आहे.
भाजपतील दोन गट उभे ठाकले तर..
भाजपतील ज्या प्रकारे महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून निवडणुकीच्या वेळेस भाजपतील गटबाजी बाहेर येऊ शकते. त्यात काही नगरसेवकांचा काही नावांना विरोध असून, ही मते सेनेच्या खात्याला ही जाऊ शकतात. दरम्यान, भाजपमधून आव्हान निर्माण झाल्यास सेनेची भूमिका काय राहील, याचा बी प्लॅन देखील सेनेच्या नेत्यांकडून तयार करण्यात आला आहे. याबाबत देखील संपर्कप्रमुख संजय सावंत लवकरच सेना नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. यासह माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपसोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपतील त्यांचे समर्थक असलेले नगरसेवक त्यांच्या संपर्कात होते. त्या नगरसेवकांचीही भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.