पारोळा : येथील बाजारपेठेत ठेलागाडी, दुकानाच्या पुढे भाड्याने जागा देऊन दुकाने लावू देण्याच्या प्रकारामुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होतो. म्हणून ही वाहतुकीची कोंडी फुटावी, सर्वाना मोकळा श्वास घेता यावा यासाठी बाजारपेठेतील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावी, अशी मागणी शिव छावा संघटनेने केली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांना निवेदन दिले आहे.
सध्या कोरोनाचे सावट असताना नियम धाब्यावर बसवून बाजारपेठ सुरू आहे. शनिवारी व रविवारी बाजारपेठेत खूप गर्दी पाहण्यास मिळते. अवजड वाहने बाजारपेठेत येऊन थेट दुकानाच्या पायरीला वाहन लावून गाडीतून माल उतरविला जातो. बाजारपेठेत शिस्त नसल्याने बेशिस्तपणामुळे बाजारात वाहतूक ठप्प होते. यावर उपाययोजना आखणे गरजेचे आहे. बाजारपेठेत वाहतुकीला शिस्त वेळीच लागली नाही तर त्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा शिव छावा संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिला.
यावेळी शिव छावा संघटनेचे संपर्कप्रमुख शरद चौधरी, शहर उपाध्यक्ष शेख अकील शेख इसामोदीन यांच्यासह शिव छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.