पावसाळ्याचे चार महिने गावाकडे
हरताळे, ता. मुक्ताईनगर : शेतातील पिके निघाल्यानंतर मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ आल्याचे चित्र दरवर्षी दिसत असते. परिसरात अनेक ठिकाणी मेंढपाळांचा मुक्काम शेतात दिसून येतो. वर्षातून आठ महिने या मेंढपाळांची मेंढ्या चारण्यासाठी भटकंती सुरू असते. आता पावसाळ्याची चाहूल लागताच मेंढपाळ त्यांच्या गावाकडे जातानाचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढल्यावर रिकाम्या शेतात अनेक ठेलारी, मेंढपाळ लोक आपल्या मेंढ्या चारण्यासाठी दरवर्षी हरताळेसह मुक्ताईनगर तालुक्यात येतात. शेती शिवाराच्या परिसरात पाण्याची सोय असेल तिथे मोकळ्या शेतात आपला संसार थाटतात. जेथे चारा सापडेल त्या शिवारात मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत असतात आणि शेतकरी आपल्या शेतात लेंडी खत आणि मूत्र मिळावे म्हणून एका रात्रीचे पाचशे ते सहाशे रुपये देऊन किंवा केवळ चराईवर शेतात मेंढ्या बसवतात.
शिवारात भटकंतीच्या काळात बैलगाडीत लहान मुले, घोड्यावर संसार व संरक्षणासाठी इमानदार कुत्रे असे चित्र असते. आज इथे तर उद्या तिथे स्थलांतर ते मेंढ्यांची जोपासणा करतात. आठ-पंधरा दिवस तर कधी महिन्यानंतर त्यांना गाव बदलावे लागते.
मेंढ्यांपासून मिळणारे लेंडीखत शेतीसाठी अतिशय उपयुक्त असते. अनेक ठिकाणी मेंढ्या बसवल्यानंतर किंवा नांगरणी केलेल्या ठिकाणाहून मेंढपाळ आपला मुक्काम हलवून दुसऱ्या गावातल्या शेती शिवारात जातात. हिवाळ्यातील थंडी आणि उन्हाळ्यातील लाहीलाही करणारे ऊन अंगावर सोसत लहान लहान पोराबाळांसोबत आपला संसार व आपल्या मेंढ्यांवर उपजीविका अवलंबून असल्याने पशुधनाची मोठ्या काळजीने राखण करतात. पावसाळ्यातील चार महिने मेंढपाळ आपल्या गावी राहिल्यानंतर मेंढ्यांच्या चराईसाठी नजीकच्या मध्य प्रदेशातून स्थलांतरित होत असतात.
रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खताला जास्त महत्त्व आहे. म्हणून शेतकरी त्यांना शेतात सहारा देतात. दिवाळीनंतर सुरू झालेली भटकंती जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर थांबते. पावसाळ्यातील चार महिने आपल्या गावी राहिल्यानंतर पुन्हा भटकंती सुरू होते.