जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनतर्फे गणपतीनगरातील रोटरी हॉलमध्ये कौटुंबिक कलह, हिंसाचार, पती-पत्नीमधील वाद या विषयावर परिसंवाद झाला.
व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. विवेक वडजीकर, मानद सचिव तारीक शेख, प्रकल्पप्रमुख किशोर सूर्यवंशी, वक्ते म्हणून ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. प्रताप निकम, ॲड. स्मिता चौधरी आणि समुपदेशक म्हणून डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. प्रतिभा हरणखेडकर यांची उपस्थिती होती.
ॲड. महेंद्र चौधरी यांनी कौटुंबिक कलहामध्ये काही वेळा समुपदेशनाने मार्ग निघतो. पूर्वी पंचमंडळी निर्णय घेत असत. आता न्यायालयामार्फत न्यायनिवडा होतो. पती-पत्नीमधील वादामुळे एक पिढी उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सहा महिन्यांची मुदत दिली जाते, असे सांगून नातेवाईक, समाज, समुपदेशक, वकील या सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करून अशा घटनांमध्ये समझोता घडवून आणला पाहिजे, असे सांगितले.
जळगावातील बहुतांश वकील या विषयातील केसेसमध्ये सामाजिक दायित्व म्हणून योगदान देतात, असे ॲड. प्रताप निकम यांनी सांगितले. ॲड. स्मिता चौधरी यांनी या प्रकरणांमध्ये केवळ तक्रारी, आरोपांमुळे न्याय मिळू शकत नाही तर त्यासाठी न्यायालयापुढे योग्य ते पुरावे सादर करावे लागतात, असे मत मांडले. चर्चेत अनिता सूर्यवंशी, डॉ. उषा शर्मा, आर.एन. कुळकर्णी, आधार पाटील (धानवड) यांनी सहभाग घेतला. या वेळी मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा डॉ. सुमन लोढा, डॉ. रेखा महाजन, रमेश जाजू, डॉ. धनंजय बोरोले, डॉ. अभिनय हरणखेडकर, डॉ. मनोज पाटील, श्रीरंग पाटील, सूरबाला चौधरी आदींची उपस्थिती होती.