भुसावळ : आपल्या दोन एकर शेतात गांजा पीक लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) येथील शेतकरी अतुल रवींद्र पाटील यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, शेती पिकाला शासनाचा हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेती तोट्यात जात आहे. यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर करूनही तोट्याची शेती करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्चदेखील मिळत नाही. तसेच कपाशी, भाजीपाला आणि कडधान्य कोणत्याही मालाला हमीभाव मिळत नसल्याने आम्ही शेतकरी वर्ग फार संकटात सापडलो आहे, तरी शासनाला विनंती आहे की, आमच्या शेती मालाला योग्य भाव द्यावा. त्याउलट गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या दोन एकर क्षेत्रात गांजा लागवड करण्याची १५ सप्टेंबरपर्यंत लेखी परवानगी द्यावी. अन्यथा १६ सप्टेंबरला कुऱ्हे पानाचे येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.