लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही दिवसांपासून सगळीकडेच कोरोना रुग्णांना अत्यावश्यक प्रसंगी टोसॅलिझुमॅब हे औषध दिले जाते. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या औषधाचा वापरच करण्यात आलेला नसल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात सगळीकडे अत्यावश्यक प्रसंगी टोसॅलिझुमॅब या इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता. मात्र आता १५ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहे. या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एकाही रुग्णाला टोसॅलिझुमॅब हे इंजेक्शन देण्यात आलेले नाही.
कधी दिले जाते टोसॅलिझुमॅब
कोरोना विषाणुने शरीरात प्रवेश केला की त्यावर रोग प्रतिकार शक्ती हल्ला चढवते. एक वेळ अशी येते की रोगप्रतिकारशक्ती आपल्या संपुर्ण शक्तीनिशी या विषाणुंवर हल्ला करते मात्र त्यामुळे शरीरालाच नुकसान होण्याची शक्यता असते. अशी योग्य वेळ बघुन जर रुग्णाला टोसॅलिझुमॅब द्यावे लागते. हे इंजेक्शन अशा वेळी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीलाच आवर घालते. त्याचे दुष्परिणाम आहेत. दुसऱ्या लाटेत जीएमसीत एकाही रुग्णाला हे औषध दिले गेलेले नाही, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.
ऑक्सिजनचा वापर घटला
जीएमसीत आता ऑक्सिजनचा वापर घटला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे जीएमसीतील बेड देखील रिकामे राहत आहेत. परिणामी जीएमसीत दिवसाला सात किलो लीटर ऑक्सिजन लागत होता. आता त्यात एक किलोलिटरने घट झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या अहवालानुसार गेल्या २४ तासात ६ किलो लीटर ऑक्सिजन लागला असल्याचेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.