संशय : घातपाताच्या दिशेने तपास सुरू |
जळगाव : धानवड तांडा शिवारातील वाघोबाच्या शेताजवळ रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका ३0 वर्षीय महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या महिलेचा घातपात तर झाला नाही ना या दिशेने तपास सुरू केला आहे. चिंचोलीचे पोलीस पाटील रघुनाथ रामचंद्र घुगे यांना धानवड तांडा शिवारातील वाघोबाच्या शेताजवळ एका ३0 वर्षीय महिलेचे कुजलेल्या स्थितीत प्रेत पडलेले असल्याची माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी ते घटनास्थळाकडे रवाना झाले. या ठिकाणी अंदाजे पाच फूट उंची असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाला. गळ्यापासून वर चेहरा व डोक्यावरील कातडी व मांस निघालेला हाडाचा सांगाडा दिसला. मयताची छाती व कंबरेपासून दोन्ही पाय कुजलेले आहे. प्रेताजवळ पांढर्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची एक साडी व लाल रंगाची ओढणी मिळून आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे जागीच विच्छेदन करण्यात आले. या महिलेचा घातपात तर झाला नाही या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी रघुनाथ घुगे यांच्या खबरीवरून औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास साहाय्यक निरीक्षक आर.टी.धारबडे करीत आहेत. |