लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला निघणार आहे. त्यात जिल्ह्यातील नव्याने निवडणुका झालेल्या ७८३ ग्रामपंचायतींचे सरपंच कोण, हे ठरणार आहे. यासाठी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी हे दिलेल्या वेळेत दुपारी २ आणि ४ वाजता आरक्षण सोडत काढतील. एरंडोल आणि भुसावळ या तालुक्यांच्या आरक्षण सोडती या २९ जानेवारीला सकाळी ११ वाजता निघणार आहे. तर, उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये आरक्षण सोडत २८ जानेवारीला निघेल.
यात तहसीलदारांना आरक्षण सोडत काढण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग असे आरक्षण असेल. त्यानंतर प्रांताधिकारी हे यातून महिलांसाठीचे आरक्षण सोडत काढणार आहेत. त्यात उपविभागीय कार्यालयांनुसार या सोडती काढल्या जाणार आहेत.
जामनेर आरक्षण सोडत दुपारी २, जळगावला दुपारी ४ वाजता. एरंडोल विभागात पारोळाला दुपारी २ चाळीसगावला दुपारी ४ वाजता, भुसावळ उपविभागात मुक्ताईनगर दुपारी २, बोदवड दुपारी ४, अमळनेरला दुपारी ४ वाजता, चोपड्यात दुपारी २ वाजता, पाचोरा येथे दुपारी २ वाजता, तर भडगावला दुपारी ४ वाजता आरक्षण सोडत निघणार आहे.
यावलला दुपारी २ तर रावेरला दुपारी ४ वाजता आणि चाळीसगावला दुपारी २ वाजता आरक्षण सोडत निघणार आहे.