मुक्ताईनगर : पंढरपूरच्या आषाढी सोहळ्यात मानाचा संत मुक्ताबाई पालखी सोहळा सोमवारी पहाटे पाच वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाला. तब्बल १२ तासांच्या प्रवासानंतर सायंकाळी ही पालखी पंढरपुरात दाखल झाली होती.
यासाठी दोन बसेसमधून ४० वारकरी रवाना झाले आहेत. पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते मुक्ताई पादुकांना अभिषेक व पूजन करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने वारकरी भाविक आणि भजनी मंडळी उपस्थित होते.
दरवर्षी जवळपास एक हजारावर वारकरी पायी दिंडीमध्ये सामील होत असतात. यावर्षीही केवळ चाळीस वारकऱ्यांना प्रवासाची परवानगी शासनाने दिले होती. त्यानुसार मुक्ताईनगरहून मलकापूर, जालना, बीड, कुर्डूवाडीमार्गे पंढरपूर अशी शिवशाही बस सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अर्थातच साडेबारा तासांच्या प्रवासानंतर पंढरपुरात पोहोचली.
बुलडाणा येथे अल्पोपहार व दुपारच्या भोजनाची व्यवस्था बीड येथे करण्यात आली होती, अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापक रवींद्र हरणे महाराज आणि जुनारे महाराज यांनी दिली.