भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे दिवाबत्ती कराचा भरणा न केल्यामुळे पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. पथदिवे त्वरित सुरू करावे या आशयाचे निवेदन विरोधी ग्रा.पं.सदस्य शकील पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी गटविकास विकास अधिकारी विलास भटकर यांना दिले.
गावातला राजकीय वातावरण दिवसागणिक तापत असून ऊणे-दुणे काढणे सुरूच आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने टाकलेला आरो प्लांट बेकायदेशीर असल्यामुळे वीजपुरवठा कट करण्यात आला. त्या दिवसापासून गावातील पथदिवेसुद्धा बंद आहेत.
निवेदनाच्या आशयानुसार प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांना याबाबत विरोधी सदस्यांनी विचारणा केली असता त्यांनी स्ट्रीट लाईटचे बिल जिल्हा परिषद व पंचायत समिती भरणा करते. ते न भरल्यामुळे लाईट बंद असल्याचे उत्तर दिले. दिवाबत्ती कर जर ग्रामपंचायत घेत असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समिती कर कसा भरणार, असा प्रश्न निवेदनात विचारण्यात आला आहे. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान यापूर्वी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी जलकुंभ धुण्यासाठी दोन दिवस गावातील पाणीपुरवठा खंडित केला असताना त्याच वेळेस कोणी तरी राजकीय द्वेषातून जलकुंभाच्या पाईपात सिमेंट मिश्रित गोळा अडकून पाणीपुरवठा बंद केल्याचे प्रकार घडल्याचे आरोप ठाकरे यांनी केले होते.
आतापर्यंत साकेगाव ग्रामपंचायतीतील इतिहासात दिवाबत्ती बिलाचा भरणा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत होते, याविषयी लवकरच जि.प.सी.ओ व बीडीओनां भेटून तोडगा काढण्यात येईल, हा प्रकार साकेगाव पुरता मर्यादित नसून राज्य सरकारने अनेक ग्रामपंचायतीचे वीज बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन कट केले आहे.
- आनंद ठाकरे, प्रभारी सरपंच, साकेगाव.