पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी घरी बोलावून रिव्हॉल्वर दाखवून एक लाखाची खंडणी मागून खिशातील वीस हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप रवींद्र चौधरी व सागर चौधरी यांनी केला असला तरी या प्रकरणाची चौकशी करताना या दोन्ही गोष्टींचा कुठेही व कोणाच्या तोंडून हा उल्लेख आलेला नाही. तसेच जीवन पाटील या कर्मचा:याच्या समक्ष हा प्रकार घडल्याचे म्हटले होते, मात्र प्रत्यक्षात पाटील यांनीही हे आरोप चौकशीत नाकारले आहेत. तपासाधिकारी किशोर पाडवी यांच्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झालेला आहे. हा अहवालच ‘लोकमत’ च्या हाती लागला आहे. सादरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक र पाडवी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी सागर चौधरी, रवींद्र चौधरी, नगरसेवक ललित कोल्हे, अशोक सादरे, कर्मचारी राजेंद्र उगले, अनिल फेगडे, किरण पाटील, शैलेश चव्हाण, ललित भदाणे, ज्ञानेश्वर वाघ, सुनील पाटील, शशिकांत महाले, गोपाल बेलदार, हितेश बागुल, सुधाकर शिंदे, जीवन पाटील व तलाठी सत्यजित नेमाने आदींची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदविले आहेत. सादरे यांनी वाळू व मुरुमाचे डंपर पोलीस स्टेशनला आणण्यासाठी गुन्हे शोध पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार ही वाहने पोलीस स्टेशनला आणण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना सादरे यांनी कारवाई केली नाही व चौधरीला घरी बोलावून घेतले. परंतु धाक दाखवून पैसे काढून घेतल्याचा चौकशीत कुठेही याचा उल्लेख आलेला नाही. मात्र ही घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला असेही पाडवींनी अहवालात म्हटले आहे. ललित कोल्हे व सादरे यांच्या संभाषणावरुन वाळूच्या ठेक्यावरुन अथवा उधारीच्या नावाखाली पैसे मागितल्याचे दिसत आहे. त्यात त्यांच्या बोलण्यावरुनच वाळू वाहतुकीसंबंधी वाद झालेला आहे.
सादरे यांनी खंडणी व पैसे घेतले नाही
By admin | Updated: October 26, 2015 00:43 IST