जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या अनुक्रमे आसोदा आणि धरणगाव येथील स्मारकांच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी विस्तृत आढावा बैठक घेतली. या संदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक घेऊन या दोन्ही स्मारकांच्या कामाला गती देण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.
खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा येथील स्मारकाचे काम निधीअभावी रखडले आहे. याचप्रमाणे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या कामातही अडथळा आला आहे. कोविडच्या आपत्तीमुळे सुमारे दीड वर्षापासून निधी मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून कामांना निधी मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्र्यांनी शुक्रवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात दोन्ही स्मारकांच्या कामांसाठी आढावा बैठक घेतली.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, प्रांजल पाटील, सहायक अभियंता सुभाष राऊत, मुकेश ठाकूर, सहायक अभियंता एस. बी. पाटील, शाखा अभियंता सी. व्ही. महाजन आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी बहिणाबाई चौधरी स्मारक समितीचे पदाधिकारी किशोर चौधरी, तुषार महाजन, बंडू भोळे, महेश भोळे, नितीन चौधरी, अजय महाजन, वर्षा भोळे आदींसह इतरांची उपस्थिती होती.
दरम्यान, दोन्ही स्मारकांच्या कामांना तत्काळ गती देण्यासाठी मंत्रालयात पुढील बुधवारी बैठक आयोजित करण्यात येणार असून, याच्या कामांचा मार्ग मोकळा होणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.