लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात झालेल्या गौण खनिज घोटाळ्यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून, यात बहुतांश पावत्यांची पडताळणीच करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. विषेश म्हणजे पावत्या बनावट असल्याबाबत तक्रार असताना चौकशी समितीने निविदा प्रक्रियेबाबत चौकशी केली आहे. एकंदरीत चौकशी समितीने अहवाल गोलमाल केला असल्याचा आक्षेप तक्रारदार जि.प सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे.
गौण खनिजप्रकरणी ठेकेदाराने लाखो रुपयांची रॉयल्टी बुडविली आहे. बनावट पावत्या जोडून हा प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता त्यात अनेक पावत्या प्रशासनाच्या रेकॉर्डलाच नाहीत, असे पत्र देखील आम्हाला देण्यात आले आहे, असे पल्लवी सावकारे यांनी सांगितले. दरम्यान, या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. कृषी अधिकारी वैभव शिंदे यांच्यासह लेखा व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला असून त्यात निविदा प्रक्रियेबाबत अहवाल दिला आहे. पावत्यांची पडताळणीच केली नाही. एकीकडे चौकशी समितीला देखील रेकॉर्ड देण्यात आले नसून अनेक मेजरमेन्ट बुक देखील उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे आता तरी जि.प प्रशासनाने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करणार
लाखो रुपयांचा गैरव्यवहार असताना चौकशी समितीने आडगावच्या बंधाऱ्याबाबत रॉयल्टीची रक्कम निश्चित केली आहे. अन्य पावत्यांबाबत मात्र अहवालावर संशय असल्याचे त्या म्हणाल्या. मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्या असताना गुन्हे दाखल होण्यास दिरंगाई केली जात, असून वरिष्ठ अधिकारीच आरोपींना पाठीशी घालत आहे. याबाबत आपण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.