रावेर : महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात व मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवासी बस सुरू झाल्याने या राज्याच्या सीमांलगत राहणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना लॉकडाऊनपासून बसचा चक्का जाम झाला असताना मध्यप्रदेशातील शासनाकडून मात्र परवाना कर वसुलीची सक्ती केली जात असल्याने खाजगी बसमालक संघटनेतर्फे २०० कोड रुपयांचा कर माफ करावा अन्यथा बससेवा बंद करण्याचा इशारा दिल्याने गुरुवारपासून मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यादरम्यानची आंतरराज्य प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरळीतपणे सुरू झाली. किंबहुना, मध्यप्रदेश निगमचा परवाना असलेल्या खाजगी बस व राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बससेवा दुपारपासून सुरळीत सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कोरोनाच्या साथीरोगामुळे तब्बल चार ते सहा महिन्यांपासून मप्र व महाराष्ट्र सीमा दोन्ही राज्य सरकारने सील केल्या होत्या. कालांतराने महाराष्ट्र राज्यातील अनलॉक झाल्यापासून आपली सीमा खुली करून पोलिसांची नाकाबंदी उठविण्यात आली होती. मात्र, मध्यप्रदेशच्या राज्य सरकारने सीमाबंदी व आंतरराज्य प्रवासी वाहतुकीवर लगाम घातल्याने व्यापार, व्यवसाय, तथा सुख-दु:खाच्या कारणास्तव ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणी अहवालाखेरीज कमालीचे हाल होत होते. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांकडून रावेर ते लोणी ४० रुपये, तर लोणी ते बऱ्हाणपूर ६० रुपये, असे १०० रुपये प्रत्येकी प्रवाशांना ते सुद्धा सीमापार करण्यासाठी एक किलोमीटर पायी चालण्याचा अटीवर ठेवून बसत होता.
एकीकडे महाराष्ट्रातून खासगी वाहनाने वा खाजगी प्रवासी वाहतुकीने जाणाऱ्या प्रवाशांची ससेहोलपट होत होती, तर दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान होत होते. दरम्यान, मध्यप्रदेशातील परिवहन निगमचा परवाना प्राप्त खाजगी बस व्यावसायिकांना बसचा चक्काजाम असतानाही २०० कोटींचा जुजबी कर मध्यप्रदेश सरकारकडून आकारण्यात येत होता.
त्या अनुषंगाने संबंधित खाजगी बस व्यावसायिक संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन २०० कोटीचा परवाना कर रद्दबातल करावा अन्यथा राज्यातील अंतर्गत बसप्रवासी सेवा बंद करण्याचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने मध्यप्रदेश सरकारने आंतरराज्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससेवेची कवाडे महाराष्ट्र सीमेवर खुली करून मध्यप्रदेश परिवहन निगमची खाजगी ठेकेदारांची बससेवा सुरळीतपणे सुरू केली. मध्यप्रदेश परिवहन निगमची खाजगी बसफेरी रावेर बसस्थानकात दाखल होताच रावेर आगारातूनही गुरुवारी उशिराने चार ते पाच बसफेऱ्या परतीच्या प्रवासात सुरू करण्यात आल्या
दोन्ही राज्यांतील बससेवेसोबतच खाजगी प्रवासी वाहतूकही खुली करण्यात आल्याने प्रवाशांसह व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
‘गुरुवारी मध्यप्रदेशातील आंतरराज्य प्रवासी वाहतूक खुली करण्यात आली असून, त्यांच्या बस रावेर स्थानकात दाखल होताच आपल्या रावेर आगाराच्या उशिरापर्यंत चार ते पाच बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या तर शुक्रवारी पूर्ववत सेवा पुरविण्यात आली आहे.?
- जी पी जंजाळ, स्थानक प्रमुख, रावेर बसस्थानक, रावेर