रावेर तालुक्यातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर (भोकरी) हे तीर्थक्षेत्र तसे शुभमंगल विवाहांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे शुभमंगल विवाहांच्या सनई चौघडांमध्ये "नवरीचे मामा अन् नवरदेवाचे मामा.. शुभमंगल सावधान...!” चे ध्वनी कानात प्रतिध्वनीत झाले तर नवल वाटायला नको.
दरम्यान, नुकताच भाजपचा मेळावा झाला. व्यासपीठावरचा 'राज' कारणाचा 'गेम' प्लान संपल्यावर ओंकारेश्वर मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी विकासकामांचे फलक अनावरण करताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार सुरेश भोळे हे कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत मागे असताना त्यांना उद्देशून "चला नवरदेवाचे मामा..! नवरीचे मामा...!" असे संबोधताच हास्यकल्लोळ झाला. मात्र, भाऊंच्या मनातील "नवरी" अन् "नवरदेव" कोण असावेत? हा मनस्वी प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात कुजबुज निर्माण करणारा ठरला.
-किरण चौधरी