जळगाव : गैरवर्तन आणि सतत कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करत असल्याचा ठपका ठेवत ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक तथा व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन उत्तमराव बारी यांना जानेवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर आता सेवामुक्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत 'लोकमत'ने महाविद्यालयाचे प्राचार्य जे. बी. अंजने यांना संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
प्रा. नितीन बारी हे सन १९९८ मध्ये ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. मध्यंतरी त्यांनी काही चुका केल्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना मेमो दिला होता. त्यानंतर त्यांची महाविद्यालय स्तरावर चौकशी सुरू होती. अखेर प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त होऊन त्यामध्ये बारी यांच्यावर गैरवर्तन व सतत जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानुसार १९ जानेवारी रोजी संस्थाध्यक्ष यांनी बारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
बजावली होती कारणे दाखवा नोटीस
नुकतीच प्रा. नितीन बारी यांची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. त्यात ते दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे बचावासाठी खुलासा सादर करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तर न देता, संस्थेवर आरोप-प्रत्यारोप केले. अखेर संस्थेकडून त्यांच्यावर सेवामुक्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई १० जुलै रोजी करण्यात आली असून, याबाबत विद्यापीठाला महाविद्यालयाकडून पत्र पाठविण्यात आले आहे.
-------------
प्रा.नितीन बारी यांची प्रतिक्रिया
मी विद्यापीठातील राजकारणाचा व प्राचार्यांच्या व्यक्तीद्वेषाचा बळी आहे. याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहे. ‘चरैवैती चरैवैती यही तो मंत्र है अपना’ या उक्तीनुसार उच्च शिक्षणातील अराजकाविरोधात काम सुरूच राहील. लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार.
-प्रा.डॉ. नितीन उत्तमराव बारी