लेखक : अजित मुठे, अमळनेर
रामेश्वरमनंतर आता पुड्डुचेरीला जायचे होते. रामेश्वरम ते पुड्डुचेरी हे अंतर होते जवळ जवळ ५०० कि. मी. एवढे. पल्ला लांबचा होता. सर्व रस्ता समुद्रकाठाने होता. त्यामुळे एका बाजूला जमीन आणि एका बाजूला समुद्र असा अद्भुत नजारा होता. रस्त्यात नागापट्टीनम येथे पाऊस सुरू झाल्यामुळे थांबावे लागले.
सकाळी नागोर, कारंकल, चिदम्बरममार्गे पुड्डुचेरीला पोहोचलो. पुड्डुचेरी अर्थात पाँडेचरी ! योगी अरविंद घोष जे स्वातंत्र्य लढ्यात जहाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल, बाल, पाल यातील एक होते. अचानक स्वातंत्र्य लढ्यापासून दूर गेले आणि पाँडेचरी येथे त्यांनी आश्रम स्थापन केला. यालाच “अरविंद आश्रम” म्हणून ओळखले जाते. पुड्डुचेरीचे वैशिष्ट्य म्हणजे “ओराविल” येथे मन:शांती केंद्र आहे. त्याचप्रमाणे जवळ जवळ १०० वर्षे जुने दीपगृह व सॅक्रेड हर्ट चर्च आहे. सॅक्रेड हर्ट चर्च तर शंभर वर्षांपेक्षा जुने आहे. पुड्डुचेरीला सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे.
पुड्डुचेरीत अजूनही बहुतांश रेस्टॉरंट व हॉटेल्समध्ये फ्रेंच पद्धतीचे जेवण व त्याचप्रमाणे व्यवस्था आहे. आजही फ्रेंच संस्कृतीची पकड या पाँडेचरीवर आहे.
पुड्डुचेरीमध्ये फ्रेंच हॉटेल्समध्ये तंदुरी क्रोसीएन्ट, एग्ज विथ हाय ॲण्ड चिज यासारख्या फ्रेंच पदार्थांबरोबर कॅशो उत्तपंम विथ वडा करीसारखे साऊथ इंडियन डिशेस तर सुलतान पेठ या भागात नाटुकरी फ्राय चिकन लाफा, सालाना या नॉनव्हेज डिशेससोबत तुपातला वैशिष्ट्यपूर्ण पराठा मिळतो. नाई पराठा हा नुसताही खाता येतो. बिर्याणी तर जागो जागी मिळतेच. येथे सांबारासाठी जे कांदे वापरले जातात ते स्पेशल असतात. त्यांना सांबार वेंगायन म्हणतात. दक्षिण भारतात सर्वत्र केळीच्या पानावर इडली, डोसा, पोंगल, उत्तपा तर मिळतातच. मात्र, जेवणही केळीच्या पानामध्ये हा फरक आहे. जी पाने फक्त देवाचा प्रसाद ठेवण्यासाठी वापरतात त्यांना सॅलेवरी म्हणतात, तर जी पाने जेवणासाठी वापरतात त्यांना सपाटेल असे म्हणतात. वैशिष्ट्येपूर्ण जेवणामुळे सोबत असलेल्या तीनही जणांची जणू मजा होती. माझे मात्र जेवणाचे हाल होत होते. उत्तपा, इडली खाऊन दिवस काढावे लागत होते. पुड्डुचेरीचा पाहुणचार झाल्यावर आता बंगलोरकडे कूच करायचे होते.
पुड्डुचेरीहून बंगलोरकडे जाण्यासाठी दोन मार्ग होते. एक वेलारमार्गे होता, तर दुसरा चेंगम, उथनगरईमार्गे होता. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने वेलोरमार्गे निघालो. दोन्हीही रस्ते कृष्णगिरी येथे मिळत होते. रात्री बंगलोरला पोहोचलो. बेंगलोरला ओयो रूम्स बुक केली होतीच. मात्र, तिथे फसवणुकीचा अनुभव आला. हॉटेल म्हणून जी इमारत दाखविली होती ती प्रत्यक्षात अपार्टमेंट सोसायटी होती. त्यातील काही फ्लॅट हॉटेल मालकाने घेतले होते.
सकाळी बंगलोरहून निघालो. आता हम्पीला जायचे होते. मात्र, रस्त्यात चित्रदुर्गाला आल्यावर प्लॅन बदलला आणि कोल्हापूरला जायचे ठरले. बंगलोर - कोल्हापूर ६५० कि.मी. होते. कोल्हापूरकडे रपेट सुरू झाली.
कमलाकर रणदिवे यांनी काही काळ कोकणात नोकरी केलेली असल्याने त्यांचे कोल्हापूरशी जवळचे संबंध होते. कोल्हापूरला त्यांचा मित्र होता त्याच्याकडे मुक्कामी जायचे ठरले. कोल्हापूर हे पहिलवान आणि तांबडा व पांढरा रस्सा यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. रात्री कोल्हापूरला एक - दोन वाजता पोहोचू असा अंदाज होता, तरी कोल्हापूरचा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा हाक मारत होता. रात्री अडीच वाजता पोहोचल्यावरही या तिघांनी तांबडा रस्सा व पांढऱ्या रश्श्यावर ताव मारला. मला मात्र कॉफीच्या एका कपावर भागवावे लागले. असो... सकाळी कोल्हापूरहून पुण्याकडे निघालो. पुण्याहून संध्याकाळी नाशिकला पोहोचलो आणि एक स्वप्न पुन्हा पूर्ण झाले. (उत्तरार्ध)