लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कापसाची हंगामपूर्व लागवड केल्यास त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापूस लागवड न करता शेतकऱ्यांनी १ जूननंतरच कापूस लागवड करावी, असे आवाहन केले आहे. तसेच बियाणेदेखील १ जूननंतरच बाजारात उपलब्ध होणार आहे. मात्र, कृषी विभागाच्या या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून, १५ मेनंतर बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्यात कापसाचा पेरा अंदाजे साडेचार ते साडेपाच लाख हेक्टर आहे. यापैकी बागायत कापसाची लागवड प्रामुख्याने शेतकरी मे महिन्यात करीत असतो; परंतु शासनाने दिलेल्या आदेशानुसार १ जूननंतर शेतकऱ्यांना कापूस बियाणे उपलब्ध व्हावे, असे आदेशित केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाने शेतकऱ्यांना कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत खा. उन्मेष पाटील यांनीदेखील कृषी सचिवांकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.
तर परराज्यातून बियाणांचा होऊ शकतो काळाबाजार
कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध न झाल्यास, शेतकरी जवळच्या राज्यातून अथवा काळाबाजारातून या पर्यायी मार्गाने बियाणे खरेदी करतील. यात त्यांना बोगस बियाणे तसेच त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ‘एक गाव एक वाण’ याला देखील एक जूननंतर बियाणे उपलब्ध झाल्यास या कार्यक्रमाला हरताळ फासले जाईल. कारण शेतकरी कापूस लागवडीसाठी जून महिन्यापर्यंत थांबत नसतो ही वस्तुस्थिती असल्याचे राज्याचे कृषी सचिव तसेच कृषी आयुक्त यांच्याकडे खा. उन्मेष पाटील यांनी कळविले आहे.
बागायती कापूस लागवड झाल्यास, तीन हंगाम घेता येऊ शकतात
असोदा येथे प्रगतिशील शेतकरी किशोर चौधरी सांगतात की, जिल्ह्यात ७० टक्के शेतकरी हे बागायती कापसाची लागवड करतात. यामुळे शेतकऱ्यांना तीन हंगामदेखील घेता येऊ शकतात. कापसानंतर हरभरा व हरभऱ्यानंतर बाजरीची लागवड शेतकरी करतात. मात्र, बागायती कापसाची लागवड न झाल्यास शेतकरी केवळ दोन हंगाम घेतात. तसेच उत्पादनदेखील थोडे उशिरानेच मिळत असते. त्यामुळे जे अनेक वर्षांपासून सुरू आहे त्याचप्रमाणे हे चक्र कायम ठेवण्याची गरज असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
कोट..
बागायती कापसाची लागवड झाल्यास मान्सूनआधीच शेतामध्ये कापसाचा पेरा चांगल्या प्रकारे उतरत असतो. तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीदेखील कमी झाला होता. उशिराने लागवड झाल्यास उत्पादनावर देखील मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापसासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे.
-भास्कर खंडू पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, आडगाव, ता. चोपडा
शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड करू नये, असे आवाहन केले जात आहे. गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पसार झाला होता. हंगामपूर्व कापसाची लागवड न झाल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासून हा निर्णय घेण्याची गरज आहे.
-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव.