फैजपूर, ता. यावल : शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूर वारी बंद करणाऱ्या शासनाचा सर्वधर्मीय संतांकडून तीव्र शब्दात निषेध करून, यासह इतर मागण्यांसाठी येत्या १७ जुलै रोजी सर्व तहसील कार्यालयांसमोर भजन आंदोलन करण्यात येणार आहे, असे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ बंडातात्या महाराज यांना शासनाने अटक करून स्थानबद्धतेची केलेली कारवाई, वारकरी संप्रदायाच्या पताका, ध्वज जप्त करून त्यांचा गणवेश बदलण्याची दिलेली तंबी यासह अनेक बंधने लादली जात आहेत, हे निषेधार्ह आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी बाब असल्याने याचा अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय सनातन सत्पंथ, स्वामीनारायण पंथ, महानुभाव पंथ, दिगंबर महाराज संस्थान, वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे.
सतपंथ मंदिर संस्थान या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समिती कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, अखिल भारतीय संत समिती सदस्य तथा खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, महानुभाव पंथाचे सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामीनारायण गुरुकुल संस्थांचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दासजी, दिगंबर महाराज संस्थान अंजाळे येथील धनराज महाराज, नरेंद्र नारखेडे, विश्व हिंदू परिषदेचे कायम कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी, विश्व हिंदू परिषदेचे नारायण घोडके, विनोद उबाळे, भुसावळ जिल्हामंत्री योगेश भंगाळे, कालिदास ठाकूर, बजरंग दल शहराध्यक्ष लोकेश कोल्हे यांची उपस्थिती होती.