लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बांभोरी येथील गिरणा नदीवरील पूल आणि पिंप्राळा येथील रेल्वे ओव्हर ब्रीज यांच्यासह खोटे नगर ते पाळधी आणि शहराच्या पुढे तरसोदपर्यंत जो भाग महामार्ग चौपदरीकरणात समाविष्ट करण्यात आला नव्हता. त्या रस्त्यांसाठी आता ८४ कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव तयार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नवी दिल्लीतील कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे तर आता दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
महामार्गावर सध्या पाळधी येथे जेथून बायपास सुरू होतो तेथून शहराकडे खोटेनगरपर्यंतचा भाग हा दोन लेनचाच आहे. तसेच कालंका माता मंदिराच्या पुढे तरसोदपर्यंतचा काही भाग हादेखील दोन पदरीच आहे. बांभोरी येथील गिरणा नदीवरील पूल आणि पिंप्राळा येथील रेल्वेवरील पुलाचे काम पहिल्या टप्प्यातून वगळण्यात आले होते. जेव्हा ही या पुलांचा विषय निघाला तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यात ही कामे होतील, असे सांगितले जात होते. आता काही दिवसांपूर्वीच या सर्व कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाला पाठवण्यात आले आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या पहिल्या प्रस्तावात खोटे नगरपासून फक्त सात किमीचे अंतर घेण्यात आले होते. तसेच शिव कॉलनी, अजिंठा चौफुली येथील पूल वगळण्यात आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर नागरिकांचा मोठा विरोध त्यांना सहन करावा लागत होता. आता खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
कोट - बांभोरी येथे नदीवरील पूल, पिंप्राळा येथील रेल्वेवरील पूल यांचा समावेश या नव्या प्रस्तावात आहे, तसेच काही ठिकाणी चौपदरी रस्ते करण्याचा एकूण ८४ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. - उन्मेश पाटील, खासदार.