धुळे : मनपा प्रशासनातर्फे शहरातील थकीत मालमत्ता वसुलीसाठी नियोजन करण्यात येत असून पाच ते सहा वर्षांपासून सर्वाधिक थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांना आता नोटिसा न देता थेट त्यांची मालमत्ताच जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या महत्त्वाच्या उत्पन्नस्रोतामध्ये मालमत्ता कराच्या वसुलीकडे पाहिले जाते. थकीत व चालू कराची ४३ कोटींची मागणी आहे. मार्च अखेरपर्यंत केवळ २१ कोटींपर्यंत वसुली करण्यात आली आहे. वसुलीसाठी शहराचे पाच विभाग करण्यात आले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांच्या वसुलीची आकडेवारी पाहता दरवर्षी ही वसुली ५० टक्केही होत नाही. २००८-२००९ मध्ये १२ कोटी ७५ लाख ९६ हजार ३७१ रुपये, २००९-२०१० मध्ये १३ कोटी २०० रुपये, २०१०-२०११ मध्ये ६ कोटी ७६ लाख, २०११-१२ मध्ये १२ कोटी, २०१२-१३ मध्ये १८ कोटी तर यंदा ही वसुली २१ कोटींपर्यंत गेली आहे. अनेकांकडे विविध करांची थकबाकी ही ८ ते १० वर्षांपासून आहे. त्यांना वारंवार नोटिसा देऊनही ते दाद देत नाहीत. म्हणून अखेर सर्व थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांची मालमत्ता सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमान दर वर्षी ६० ते ६५ कोटी रुपयांची वसुली करून मनपाचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट्य मनपा प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहे. त्यास लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.
मालमत्ता होणार सील
By admin | Updated: May 19, 2014 01:51 IST