लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलालगत विद्युत खांब स्थलांतराचे रखडलेल्या कामासाठी आवश्यक निधी लोकवर्गणीतून उभारण्याची तयारी या भागातील नगरसेवकांनी केली आहे. याबाबतचे आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी मंगळवारी शिवाजीनगर भागातील नगरसेवकांची मनपात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यासह नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे व किशोर बाविस्कर उपस्थित होते.
विद्युत खांब स्थलांतर करण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून निधी उपलब्ध केला जात नाही. यामुळे नगरसेवकांनी लोकवर्गणीतून निधी उभारण्याची तयारी केली आहे. यासाठी केवळ शिवाजीनगर भागातील नागरिकच नाही तर जळगाव तालुक्यातील काही गावांमधील सरपंच व पदाधिकाऱ्यांना देखील या आंदोलनात सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे यांनी दिली आहे.