लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड कक्षात रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई परिधान केल्यावरच प्रवेश द्यावा, या प्रशासनाच्या आदेशानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी प्रचंड गोंधळ उडाला होता. मात्र, सोमवारी विशिष्ट वेळेचे बंधन शिथील करीत रुग्णालयाकडून अत्यावश्यक वेळी नातेवाईकांना पीपीई किट दिले जात असल्याने गोंधळ निवळला होता.
विशिष्ट वेळेचे बंधन आम्ही शिथील केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. या आधी महिनाभरापूर्वी रुग्णालयातील नातेवाईकांची गर्दी कमी करण्यासाठी रुग्णांना भेटण्यासाठी दुपारी व सायंकाळी एक विशिष्ट वेळ ठरवून देण्यात आली होती. मात्र, या वेळी प्रवेश द्वारावर प्रचंड गर्दी उसळत होती. शिवाय पीपीई किट सक्तीचा नियम लावण्यात आल्याने नातेवाईकांमध्ये प्रचंड अस्वस्थता व गोंधळाचे वातावरण रविवारी निर्माण झाले होते.