शिरसोली : शिरसोली प्र बो येथील इंदिरा नगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने आधीच त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी अखेर विद्युत रोहित्र जळाल्याने बुधवारी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. यानंतर कर्मचाऱ्यांनी दुपारी या भागात नवीन रोहीत्र बसवून अखेर वीजपुरवठा सुरळीत केला.
इंदिरानगर भागातील विद्युत रोहित्रावर प्रमाणापेक्षा जास्त भार येत असल्याने येथील विद्युत रोहित्र वारंवार निकामी होण्याचे प्रकार वाढले आहे. ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असून अंधारासह उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असतो. अशातच बुधवारी येथील विद्युत रोहित्र जळाले. यानंतर मात्र, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, सरपंच प्रदीप पाटील यांच्यासह इंदिरानगर विभागातील भागवत पाटील, अविनाश पाटील, शिवदास बारी, सुरेश भोई यांच्यासह संतप्त नागरिकांनी विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला. लाईनमन योगेश तळेले, श्रीकांत पाटील, शरीफ तडवी, खुर्शीद जमादार यांच्या सह कर्मचाऱ्यांनी अखेर नवीन रोहित्र बसविला.
कोट
इंदिरानगर विभागातील विद्युत रोहित्रावर प्रमाणा पेक्षा जास्त भार येत असल्याने तो वारंवार निकामी होते. वाढीव रोहित्राचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांना दिला असून तो परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच वाढीव रोहित्र या भागात बसविण्यात येईल. - समीर नेगळे, कनिष्ठ अभियंता