जळगाव : जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासह आपले पोलीस संकल्पनेच्या अंतर्गत १५ चारचाकी आणि ३९ दुचाकींसाठी १ कोटी ३३ लाख रूपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून वितरीत करण्यात आला आहे. यामुळे दुसर्या टप्प्यातील ही वाहने लवकरच पोलीस दलात दाखल होणार आहेत.
पोलीस दलातील वाहने कालबाह्य झाल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक पैसा खर्च होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. पालकमंत्र्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करून २३ जानेवारी २०२१ रोजी २ कोटी ३२ लाख ४१ हजार ७१ रूपयांची तरतूद केली होती. कोविडच्या आपत्तीमुळे हा निधी एकदा देण्यात आला नसून याचे दोन टप्पे करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यासाठी ९९ लाख ३२ हजार रूपयांच्या वाहने खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. यातून जिल्हा पोलीस दलास १४ चारचाकी वाहने प्रदान करण्यात आली होती. आता दुसर्या टप्प्यासाठी उर्वरित १ कोटी ३३ लाख रूपयांचा निधी जिल्हा पोलीस दलाकडे वितरीत करण्यात आला आहे. यातून बी-४ या मॉडेलची १५ चारचाकी वाहने आणि ३८ दुचाकी गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.