वाहनधारकांना कसरत करत
चालवावी लागतात वाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव, ता. भडगाव : कजगाव - नागद हा रहदारीसाठी मुख्य रस्ता असून, हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने नागद रस्त्यावरील अपघात, वाहन नादुरुस्त होणे या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हा रस्ता जळगाव जिल्ह्याला मराठवाड्यास जोडणारा जवळचा रस्ता असून, रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
कजगावपासून मराठवाडा हद्द दहा किलोमीटरवर असून, मराठवाड्यात पोहोचण्यासाठी हा अगदी जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून कन्नड, सिल्लोड, बनोटी, सोयगावसह औरंगाबाद आदी ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळचा मार्ग आहे. मात्र या मार्गावरील कजगाव ते नागद हा तेरा किलोमीटरचा रस्ता इतका खराब झाला आहे की, या मार्गाची दशा ही पायवाटेपेक्षाही खराब झाली आहे. रहदारीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या मार्गावरील अनेक गाव नित्याचे कजगावच्या व्यापारीपेठेशी जोडलेले असल्याने मोठी वर्दळ या मार्गावरून असल्याने या मार्गाचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी नेरी, वडगाव, भोरटेक, खाजोळा पिंप्री, सार्वे, टाकळी, नागदसह अनेक गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरातील अनेक खेड्यांवरून लोक कजगाव येथे नेहमी विविध खरेदीसाठी व विविध कामासाठी येतात. मात्र रस्त्याची दुरवस्था ही अनेकांना डोकेदुखी ठरत आहे. कजगाव नागद रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालवणे वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांमुळे चालकांची मोठ्या प्रमाणावर पंचायत होते, तर अनेकवेळा वाहने एकमेकांवर धडकतात. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आता पावसाळा असल्याने दुचाकी मोठ्या प्रमाणावर घसरत आहेत. त्यामुळे अनेकवेळा अपघातात नागरिक जखमी होत असतात.
230821\img-20210822-wa0030.jpg~230821\23jal_2_23082021_12.jpg
कजगाव नागद रस्त्याची झालेली दुर्दशा~कजगाव नागद मार्गाची झालेली दुर्दशा.