लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वसाधारण सभा, मेळावे आणि इतर कामांसाठी ५० लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच विनावातानुकुलित मंगल कार्यालयात लग्न समारंभ आयोजित करण्यास, बॅण्ड वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच वरात किंवा मिरवणुक काढण्याची परवानगी नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरूवारी काढले.
खुले लॉन्स, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह अशा ठिकाणी व्याख्याने, मेळावे, मुलाखती, संस्थांच्या सर्वसाधारण सभा व अन्य अनुषंगिक कार्यक्रमांचे आयोजन केवळ ५० लोकांच्या मर्यादेत करता येईल. संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या कार्यालयाकडून व अन्य कोणत्याही विभागाकडून वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पारंपरिक वाद्यवृंदाचा वापर करीत असताना ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मिरवणूक काढता येणार नाही,
लग्न सोहळ्यासाठी देखील ५० जणांची उपस्थितीचे बंधन आहे. त्यात बॅण्ड तसेच इतर पारंपरीक वाद्यांचा वापर करता येणार आहे. मात्र मिरवणुक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
या सूचनांचे पालन न केल्यास सर्व संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहिता,१८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.