जळगाव : रक्षाबंधन सणानिमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे गणपती नगरातील रतनलाल बाफना स्वाध्याय भवन येथे सकल जैन समाजाच्या महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ताराबाई रेदासनी, उज्ज्वला टाटीया, पुष्पा भंडारी, ममता कांकरिया, मनीषा डाकलिया, कंचन भंसाली, सुनिता कोचर, नम्रता सेठीया, अभय कांकरिया, प्रमोद संचेती उपस्थित होते.
श्री जैन युवा फाउंडेशनचे मनोज लोढा, अध्यक्ष आनंद चांदीवाल, सचिव विनय गांधी, प्रितेश चोरडिया, राहुल बांठिया, जितेेंद्र लोढा, रिकेश गांधी, चंद्रशेखर राका, सनी कावडीया आदी उपस्थित होते.
जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी तळे
जळगाव : रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सकाळी ११.३० वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. या वेळी सखल भागासह खराब रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये अधिक पाणी साचले होते. यामध्ये गिरणा टाकी परिसर, बालगंधर्व सभागृह, जि.प. परिसर, दूध फेडरेशन रस्ता, जिल्हा क्रीडा संकूल परिसर इत्यादी भागात पाणी साचले होते. शिवाय रस्त्यांवरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.
रिक्षांच्या गराड्यामुळे कोंडी
जळगाव : टॉवर चौक ते कॉंग्रेस भवन दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी रिक्षा लावल्या जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. समोरच शहर पोलीस ठाणे असले तरी या समस्येकडे लक्ष दिले जात नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रिक्षांची लांबच लांब रांग लागल्याने फुले मार्केटच्या प्रवेशद्वारासमोरही मोठी कसरत करावी लागते.
साफसफाईची मागणी
जळगाव : न्यू बी. जे. मार्केट परिसरात प्रचंड कचरा साचला आहे. तसेच नाल्यांच्या शेजारी कचऱ्याचे ढीग झाले आहेत. परिणामी, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका
जळगाव : शहरातील जुन्या बस स्थानकासमोर विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे रस्त्यावर दररोज वाहतूककोंडी निर्माण होत आहे. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारवाईची मागणी होत आहे.