रेल्वे स्टेशन परिसरातून रिक्षा लांबविली
जळगाव : रेल्वे स्थानक परिसरात पार्कींग केलेली विलास सुंदरलाल पोरवाल(५७,रा.द्रौपती नगर) यांच्या मालकीची मालवाहू रिक्षा (क्र.एम.एच.१९ डब्लु ०२२०) चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सकाळी ६.२० ते ६.४० दरम्यान एक संशयीत त्यात कैद झालेला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चारित्र्यावर संशय, पाच लाखासाठी छळ
जळगाव : चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण व पिठाची गिरणी सुरु करण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती उमेश दत्तू लोहार, सासरे दत्तू भाऊलाल लोहार, सुमन दत्तू लोहार, जगदीश दत्तू लोहार, आरती जगदीश लोहार, मनिषा मनोज लोहार व मनोज लोहार (सर्व रा.पांडेसरा, सुरत) यांच्याविरुध्द सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.