देवपूर नावाच्या गावात एक शेतकरी राहत होता. त्या गावात एक शेटजी होता. तो सावकारीचा धंदा करीत असे. शेतकऱ्याचे त्या शेटजीकडे येणे-जाणे होते. उन्हाळ्याच्या दिवसात तो सावकाराकडून पैसे घेई आणि हंगाम आला म्हणजे व्याजासह परत करीत असे. शेतकरी एकदा आपला मुलासोबत शेटजीच्या हवेली समोरून जात होता. शेटजीने त्याला बघितले नि बोलावले. शेटजीकडे एक ज्योतिषी बसलेला होता. तो तळहात बघून भविष्य सांगत होता. शेटजी त्याला त्यांच्या मुलाचा हात दाखवित होते. ज्योतिषी लोभी होता. त्याने अनेक मनातील मनोरे रंगवून सांगितले.शेटजीने शेतकºयाला म्हटले, ‘‘तुझ्या मुलाचाही हात दाखव. तेव्हा शेतकºयाने त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. ज्योतिषानेही उत्सुकता दाखविली नाही. कारण याच्याकडून आपल्याला काय दक्षिणा मिळेल, असा त्या ज्योतिषाने विचार केला. पण त्याने मुलाकडे बघून शेरा मारत म्हटले, ‘‘याचा काय हात बघायचा? हा बावळट आहे. हा जीवनात काहीही करू शकणार नाही.’’त्या ज्योतिषाचे ते बोलणे मात्र शेतकरी व त्याचा मुलगा दोघांना काट्यासारखे झोंबले. त्यांनी ठरवलं. या ज्योतिषाला ‘खोटारडा’ ठरवायचं. ते दोघे बापबेटे रात्रंदिवस कष्ट करू लागले. नांगरणी-वखरटी वेळेवर केली. शेत स्वच्छ केले. बांध-बंदिस्ती केली. उत्तम खताची व्यवस्था केली. वेळेवर पेरणी झाली. निंदणी, खुरपणी, कोळपणी करून तण काढले.त्यांच्या शेतातील ज्वारीचं पीक तरारलं. ते जोमानं वाढू लागलं. उत्तम हंगाम आला. ते बचतही करू लागले. त्यांना कपाशीच्या पिकाचे तर उत्तम पैसे मिळाले. आणखी एक शेत खरेदी केले. कामासाठी आता मजूरही आवश्यक होते. चार वर्षातच ते श्रीमंत झाले. शेटजी सारे बघत होते. त्यांनाही कष्ट रंग आणत असल्याचे जाणवले.तात्पर्य : कष्टानंच माणूस आपलं भाग्य घडवितो. कष्टाला पर्याय नसतो. कष्ट न करणाºयांना त्यांचं भाग्यही साथ देत नाही.-प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी
कष्टाचा रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:57 IST