जळगाव : शहरापासून ३० किमी दूर असलेले पद्मालय हे गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. पद्म आणि आलय या दोन शब्दांपासून बनलेले पद्मालय, याचा अर्थ होतो कमळाचे घर, मंदिराच्या जवळ असलेल्या तलावातील कमळ हे गणेशाला समर्पित आहेत.
पद्मालय मंदिर हे भारतातील गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. येथे दोन स्वयंभू गणेशमूर्ती आहेत. आमोद आणि प्रमोद या दोन्ही मूर्ती प्रवाळ आहेत. या मूर्ती १०० हून अधिक वर्षांपूर्वी मंदिराजवळील तळ्यात मिळाल्या होत्या. गणेश पुराणातील उपासना खंडातदेखील या मूर्तींचा उल्लेख आढळतो.
संत सद्गुरु गोविंद महाराज शास्त्री बर्वे यांनी १९०३ मध्ये पद्मालय येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर पूर्वीच्या काशी विश्वेश्वरांच्या मंदिराची प्रतिकृती आहे. या मंदिरात डाव्या आणि उजव्या सोंडेच्या अशा दोन गणेशमूर्ती आहेत. त्या कशा अवतरल्या त्यासंदर्भातील माहिती पुराणांमध्ये आढळते.
मंदिराचे दगड हे आमडदे येथील खाणीतून आणले होते. त्यांची वाहतूक आमडदे, पिंपरखेड, आडगाव, कासोदा, जवखेडे सीम, गायरान, गालापूर मार्गे केली गेली. त्या काळात पाण्यासाठी खोदलेल्या विहिरी जवखेडे गायरानात आजही आहेत. मंदिरात नऊ सुवर्ण कळस आहेत.
पद्मालय अरण्यातील दौलतपूर या गावाच्या संस्थानिकांनी मंदिर बांधले जाण्या आधीपासूनच पूजेची प्रथा कायम केली होती.
मंदिर बांधणाऱ्या गोविंद महाराजांचा मठ आजही तळई येथे आहे. त्यांचे वारस नारायण महाराज बर्वे यांची समाधीदेखील आहे.