लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर पुन्हा नव्याने चक्रवाती क्षेत्र तयार झाले असून, हे क्षेत्र थेट बंगालचा उपसागरापासून थेट अरबी समुद्रापर्यंत पसरले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
यावर्षी जून ते ऑगस्ट या पावसाळ्यात तिन्ही महिन्यात सरासरीपेक्षा ही कमी पाऊस झाला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने नवीन रेकॉर्ड तयार केला असून, एकूण सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, अजून सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज असल्याने ही सरासरी अजून वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण १०५ टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झाला असून, ही सरासरी ११० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात परतीचा पाऊसदेखील सुरू होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढली असून, तापमानातदेखील काही प्रमाणात वाढ झाल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. तसेच पाऊस अधिक झाल्यास पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असून, सोयाबीनसह कापसाचेही नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.