लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील कोरोना रुग्णसंख्ये शनिवारी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शून्य ते अधिकाधिक पाचपर्यंत नोंदविण्यात येणारी रुग्णसंख्या शनिवारी आठ नोंदविण्यात आली आहे. आरटीपीसीआर अहवालात हे सर्व बाधित आढळून आले आहेत. दुसरीकडे दोन रुग्ण बरे झाले आहे.
गेल्या दोन ते अडीच महिन्यांची नवे रुग्ण कमी व बरे होणारे रुग्ण अधिक ही साखळी शनिवारी खंडित झाली. यात नवे रुग्ण अधिक व बरे होणाऱ्यांची संख्या काहीशी वाढली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. सुदैवाने कोरोनाचा एकही मृत्यू नाही. शनिवारी जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यात जळगाव ग्रामीणमध्येही एक रुग्ण आढळून आला असून, एक रुग्ण बरा झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या दोनवर स्थिर आहे.
१२ तालुक्यांमध्ये दिलासा
जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा कमी सक्रिय रुग्ण असल्याने दिलासा आहे. केवळ जळगाव शहर, भुसावळ व चाळीसगाव या ठिकाणच्या सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. यात चाळीसगावात सर्वाधिक ४१, तर जळगाव शहरात ३२ आणि भुसावळात १८ रुग्ण आहेत.