निधी खर्च - २२ कोटी.
आतापर्यंत ३ वेळा शासनाने निधी खर्चाला मुदतवाढ दिली.
२५ कोटींच्या अखर्चित निधीवरून २१ महासभा गाजल्या.
३१ मार्च २०२१ पर्यंत निधी खर्च न झाल्यास परत जाणार निधी.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेला चार वर्षांपूर्वी म्हणजेच जून २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता; मात्र चार वर्षांत मनपा प्रशासनाला २२ कोटी रुपयेच खर्च करता आले असून, उर्वरित ३ कोटी रुपयांचे नियोजनच मनपाने अद्यापही केलेले नाही. विशेष म्हणजे या निधीच्या खर्चाची मुदत ३१ मार्चपर्यंत असून, हा निधी खर्च केला गेला नाही तर हा निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे.
मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा उदासीनतेचा कळस काही वर्षांमध्ये पहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी मनपाला मिळालेल्या १०० कोटींचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. त्यानंतर विद्यमान शासनाने या निधीवर स्थगिती आणल्याने या निधीतून कामे होऊ शकलेली नाहीत, तर दुसरीकडे चार वर्षांपूर्वी प्राप्त झालेला २५ कोटींचा निधी सत्ताधारी व प्रशासनाला खर्च करता येत नसतील तर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा तरी कशा मिळतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महासभा घेणार निर्णय
मनपाकडून ट्राफिक गार्डनची जागा विकसित करण्यासाठी १ कोटी रुपयांची तर स्मशानभूमीत विद्युत दाहिनी उभारण्यासाठी ८० लाख रुपयांची तरतूद २५ कोटींच्या निधीतून करण्यात आली होती; मात्र ट्राफिक गार्डनची जागा न्यायालयात देण्यात आली, तर विद्युत दाहिनीचे काम हे केशव स्मृती प्रतिष्ठानकडून केले जात असल्याने हा निधी शिल्लक आहे. यांसह इतर कामांतून शिल्लक रक्कम मिळून २५ कोटींपैकी ३ कोटी रुपयांचा निधी शिल्लक असल्याची माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. मनपाकडून या ३ कोटींचे नियोजन करून महासभेची मान्यता घेऊन विभागीय आयुक्तांसह मंत्रालयातील प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ३१ मार्चपूर्वी हे नियोजन पूर्ण करण्यात येणार असून, या निधीच्या खर्चासाठी शासनाकडे मुदतवाढ देखील मागितली जाईल, अशीही माहिती मनपा आयुक्तांनी दिली.