चाळीसगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे दुकाने, घरे यांची पडझड, शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी पूरग्रस्तांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
शनिवारी सकाळी मंत्री जयंत पाटील यांनी प्रथम शहरातील तितुर नदीकाठी असलेल्या परिसरातील वस्तीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील वाकडी, वाघडू, रोकडे, बाणगाव, जावळे, कोदगाव या गावांना भेट देऊन तेथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पाहणी दरम्यान त्यांनी नुकसाग्रस्त भागाचे शासनातर्फे पंचनामे सुरू आहेत, हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या धोरणानुसार मदत दिली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
भविष्यात पुराच्या पाण्यापासून गावाचे संरक्षण करण्यासाठी नदीकाठच्या गावांना आवश्यकतेनुसार संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. तसेच शहरासह इतर ठिकाणी नदीकाठी विनापरवाना बांधकाम असलेले सर्व अतिक्रमण काढण्यात येणार आहे, तशी सूचना आपण जिल्हाधिकारी यांना देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासकीय यंत्रणांकडून सतर्कतेबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही मंत्री जयंत पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले.
त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समिती सभापती अजय पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जि.प. सदस्य भूषण पाटील उपस्थित होते.