सुनील पाटील
गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या अवैध धंद्यांचा बाजार आता जिल्ह्यात खुला झाला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, डॉ.पंजाबराव उगले यांच्या कार्यकाळात अवैध धंदे पूर्णपणे बंद नव्हते, मात्र त्यांना लगाम निश्चितच बसला होता. अवैध धंद्यांची वसुली करणाऱ्या ८१ पोलीस कर्मचाऱ्यांना दत्ता शिंदे यांनी नवचैतन्य कोर्सच्या नावाखाली मुख्यालयात जमा केले होते, तर डॉ. उगले यांनीही अवैध धंदे चालकांशी संबंध ठेवणाऱ्यांना मुख्यालयात जमा करण्यासह निलंबन तर काहींवर बडतर्फीची कारवाई केली होती. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अवैध धंदे सुरू करण्याची हिंमत कोणीच केली नाही. प्रभारी अधिकारी व वसुलीबहाद्दरही दचकूनच होते. धंदे सुरू करावेत म्हणून धंदेचालक पोलिसांमागे फिरत होते, आता परिस्थिती उलट झाली आहे. काही पोलीस अवैध धंदे चालकांच्या दारी जाऊन धंदे सुरू करण्याची गळ घालत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात निर्माण झाले आहे. या धंद्यांवरून वसुली करणाऱ्या पोलिसांमध्येही गट-तट व स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात मोठा स्फोट होण्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्यासाठी जिल्हा नवा आहे. मुंढेची काम करण्याची पध्दत अगदी सरळ आहे. कर्मचाऱ्यांना त्यांची पध्दत भावलीदेखील, परंतु सर्वच बाबी पोलीस अधीक्षकांना माहिती असतात असे नाही, परंतु अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील राजकारण खूप डोकेदुखी ठरते. अशाच राजकारणाचे बळी डॉ. जालिंदर सुपेकर ठरले होते. काहीही संबंध नसताना अनेक संकटांना सुपेकरांना सामोरे जावे लागले होते. पोलीस अधीक्षकांनी आपल्या यंत्रणेला आताच आवर घालणे गरजेचे आहे, अन्यथा काही दोष नसताना पोलीसप्रमुख म्हणून डॉ.मुंढे यांनाही संकटांना सामोरे जावे लागेल. थोडक्यात ताकही फुंकून पिण्याची वेळ निर्माण झाली आहे.