नंदुरबार : वार्षिक तपासणीदरम्यान पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक काहीतरी नवीन घोषणा करून नंदुरबारवासीयांना सुखद धक्का देतील, अशी अपेक्षा असताना केवळ औपचारिक पाहणी करून अवघ्या तासाभरात त्यांनी येथून निघणे पसंत केले. त्यामुळे मॉडेल स्थानक, मेमो ट्रेन, मुंबई बोगी यासह इतर स्थानिक मागण्या आणि प्रश्न ‘जैसे थे’ राहिल्याचे चित्र आहे. दरम्यान, या वेळी लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. नंदुरबार रेल्वेस्थानकाच्या वार्षिक तपासणीसाठी पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक सी.जी. अग्रवाल बुधवारी सकाळी नंदुरबारात आले होते. विशेष ट्रेनद्वारे सकाळी नऊ वाजता त्यांचे आगमन झाले. वार्षिक तपासणीनिमित्त गेल्या महिनाभरापासून रेल्वेस्थानकात विविध कामे सुरू होती. रंगरंगोटी करून स्वच्छता करण्यात आली. त्यासाठी पश्चिम रेल्वेचे डीआरएम यांनी तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी तीन ते चार वेळा बैठक घेवून अधिकारी व कर्मचा:यांची तयारी करवून घेतली होती. सरव्यवस्थापक येणार, नवीन काही घोषणा करणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु कुठलीही महत्त्वपूर्ण घोषणा न करता त्यांनी केवळ वार्षिक तपासणीला महत्त्व दिले. विद्युत केंद्राचे उद्घाटन अग्रवाल यांच्या हस्ते रेल्वेस्थानकातील दुस:या विद्युत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे विजेचा प्रश्न सुटून दुहेरीकरणासाठी लागणा:या अतिरिक्त विजेची सोय या माध्यमातून होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून या विद्युत केंद्राचे बांधकाम सुरू होते. विविध विभागांची पाहणी सरव्यवस्थापक अग्रवाल यांनी वार्षिक पाहणीदरम्यान स्थानकातील विविध विभागांची पाहणी केली. लोकोपायलट कॅबिन, कंट्रोलरूम, प्रतीक्षालय, तिकीट खिडकी या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. रेल्वे स्थानकातील स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. पिण्याच्या पाण्याची योग्य आणि पुरेशी सोय करण्यासाठी त्यांनी संबंधिताना सूचना दिल्या. प्रतीक्षालयातील सुविधा आणखी वाढविण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शनदेखील केले. आश्वासन/ घोषणा नाही नंदुरबार स्थानकाला मॉडेल स्थानकाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु त्यासंदर्भातील कामे संथगतीने सुरू आहेत. सरव्यवस्थापकांच्या भेटीदरम्यान मॉडेल स्थानकाची कामे व दुहेरीकरणासंदर्भात काही घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी कुठलीही नवीन घोषणा केली नाही. केवळ येत्या सहा महिन्यांच्या आत नंदुरबार ते सुरत दरम्यान दुहेरी रेल्वे वाहतूक सुरू करण्यासंदर्भात सूतोवाच केले. खांडबारा ते उधना दरम्यान काम पूर्ण झाले आहे. आता खांडबारा ते नंदुरबार दरम्यान विद्युतीकरणाचे काम बाकी आहे. ते येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करून सहा महिन्याच्या आत नंदुरबार ते सुरतदरम्यानची दुहेरी वाहतूक सुरू होणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. दुहेरीकरणाच्या कामाची मुदत 2017 र्पयत आहे. त्याच्या आत काम पूर्ण करण्याचे नियोजन असून येत्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असल्याचेही अग्रवाल यांनी या वेळी सांगितले. विविध विभागांच्या पाहणीनंतर त्यांच्या हस्ते रेल्वे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत डीआरएमसह पश्चिम रेल्वेचे विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रेल्वे सल्लागार समिती रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनीदेखील सरव्यवस्थापक अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. समितीतर्फेदेखील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी हितेंद्र शाह, जितेंद्रसिंग राजपूत, यतीश देसाई, भरत शहा, पिनल शहा, लतीश पाटील, राजकुमार मूलचंद आदी उपस्थित होते. स्टेशन झाले चकाचक पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ सरव्यवस्थापक येणार त्यामुळे रेल्वेस्थानक परिसर चकाचक करण्यात आला होता. रंगरंगोटी करून सजविण्यात आले होते.
वार्षिक पाहणीची केवळ औपचारिकता
By admin | Updated: December 31, 2015 00:25 IST