तालुक्याची लोकसंख्या दोन लाख ८० हजार आहे. त्या तुलनेत केवळ ३३ हजार १६६ लोकांनाच लस देण्यात आली आहे. लस उपलब्ध होत नसल्याने मोहीम थंडावली आहे. मात्र चोपडा तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झीरोवर आल्याने बहुतांश वेळेत लस मिळत नाही म्हणून केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.
लस घ्या हो लस...
लसीकरण केंद्रावर अक्षरश: आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोंदणी केलेल्या किंवा दुसरा डोस मुदत पूर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांना स्वतः फोन करून बोलवावे लागत आहे. अर्थात कोरोना गेला या वातावरणामुळेच लोकांनी पाठ फिरवली की काय? सध्या लसीकरणासाठी गेल्या महिन्यात ज्या रांगा लागत होत्या त्या प्रमाणात सध्या लोकांमध्ये लस घेण्यासाठी उत्साह दिसून येत नाहीये.
तालुक्यात नऊ केंद्र
चोपडा तालुक्यात लसीकरणाचे एकूण नऊ केंद्र आहेत. त्यात तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी, चोपडा शहरात एक नगरपालिका रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात अशा नऊ केंद्रांवर लस दिली जात आहे. गेल्या महिनाभरापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उपकेंद्र यावरही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र लस कमी प्रमाणात येत असल्याने सर्व केंद्रांवर आळीपाळीने लसीकरण मोहीम राबविले जात आहे. चोपडा तालुक्यात दोन प्रकारच्या लस देण्यात येत आहेत. ४५ वर्षे वयाच्या वर लोकांना कोविशिल्ड ही लस, तर १८ ते ४५ वर्षे वयाच्या दरम्यान असलेल्या नागरिकांना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे. कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनंतर घ्यावा लागतो, तर कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांत घ्यावा लागतो. कोविशिल्ड या लसीचे लसीकरण पहिला डोस देऊन २६ हजार १४ लोकांचे झाले, तर दुसरा डोस केवळ पाच हजार ९५२ लोकांचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण झाले आहे. असे एकूण कोविशिल्डचे ३१ हजार ९६६ डोस देण्यात आले आहेत, तर कोव्हॅक्सिनचे फक्त १ हजार २०० डोस देण्यात आलेले आहेत. त्यातही आठशे चोपडा शहरातील नगरपालिका रुग्णालयातमार्फत देण्यात आले आहेत, तर ४०० डोस अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत देण्यात आलेले आहेत. बाराशेपैकी केवळ ४०० लोकांना कोव्हॅक्सिन दुसरा डोस देण्यात आलेला आहे. ८०० नागरिक अजूनही दुसरा डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
आठवड्यातून एकदाच लस उपलब्ध सध्या लसीचा तुटवडा जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यात लस वितरणासाठी २ भाग पाडण्यात आलेले आहेत. जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग आणि जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग असे जवळपास सात सात तालुके मिळून गट पाडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हप्त्यामध्ये पूर्व भागाला एकदा तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम भागाला एकदा लस पुरवल्या जात आहेत. आणि लसींची संख्या लसीकरण केंद्रावर केवळ ५० डोस एवढेच उपलब्ध होत आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात एक हजार लसी उपलब्ध करण्यात येत होत्या. सध्या मात्र लसींचा तुटवडा जाणवत आहे. लसीचा तुटवडा असला तरी जनतेनेही लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देण्याचे टाळलेले दिसत आहे.
उपकेंद्रावर वेळ ठरवून लसीकरण
चोपडा तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यात चहार्डी, हातेड, लासूर, वैजापूर, धानोरा, अडावद आणि गोरगावले अशा सात ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रात जवळपास ४० ते ४५ उपकेंद्रे आहेत. सध्या गेल्या महिन्यापासून उपकेंद्रवरही लसीकरण मोहीम सुरू केल्याने सर्वच केंद्रांवर एका दिवशी लस उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून उपकेंद्रनिहाय अल्टरनेट केंद्रांवर लसी उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे लसीकरण करण्याचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.