लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतराचे काम लवकर करण्यासाठी अखेर मनपा प्रशासनाने महावितरणला दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी केली आहे. राज्य शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या निधीच्या मंजुरीची प्रतीक्षा न करता, जळगावकरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागावा यासाठी मनपाने आपल्या फंडातून दीड कोटी रुपयांचा निधी महावितरणला देऊन हे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सूचना देखील दिल्या आहेत.
‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात ‘शिवाजीनगर उड्डाणपुलाची विघ्ने संपतील का?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांना याबाबत साकडे घालून या कामासाठी मनपा फंडातून दीड कोटी रुपयांचा निधी महावितरणला वर्ग करण्याची मागणी केली होती. याबाबत गुरुवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, ईबा पटेल व प्रशांत नाईक यांनी भेट घेतली. शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाचा फटका नागरिकांना बसत आहे. केवळ दीड कोटी रुपयांच्या निधीसाठी हे काम रखडणे योग्य नसून, आता राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेला निधी मंजुरीचा प्रस्तावावर मंजुरीची वाट न पाहता, मनपा फंडातून निधी महावितरणला वर्ग करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
महापौरांचे पत्र अन् मनपा आयुक्तांनीही दिली मंजुरी
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीदेखील सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावाला तयारी दर्शविली आहे. महापौर जयश्री महाजन यांनी गुरुवारीच मनपा आयुक्तांना पत्र पाठवून विद्युत खांब हटविण्यासाठी मनपातून निधी उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्यानंतर आयुक्तांनीदेखील या सूचना मान्य करत, शुक्रवारीच मनपा प्रशासन महावितरणला दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तसेच हा निधी दिल्यामुळे मनपाला काही अडचणी आल्यास त्याची जबाबदारी देखील महापौरांनी घेतली आहे.
महासभेची घेणार मंजुरी -नितीन लढ्ढा
माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी या कामासाठी पुढाकार घेतला. मनपाला जर हा निधी वर्ग करण्यासाठी काही कायदेशीर अडचणी येत असतील तर याबाबतचा प्रस्ताव महासभेत आणून त्या निधीला महासभेतून मंजुरी देण्याचीही तयारी सत्ताधाऱ्यांनी दर्शविली आहे. अडीच वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. तर विद्युत खांबाच्या समस्येमुळे हे काम गेल्या वर्षभरापासून थांबले आहे. त्यामुळे नागरिकांची समस्या सुटणे गरजेचे असून मनपाकडून निधी उपलब्ध होऊन हे काम लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे असे नितीन लढ्ढा यांनी सांगितले.
आठवडाभरातच कामाला सुरुवात
महावितरणकडून विद्युत खांब हटविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. निधी नसल्याने मक्तेदाराला कार्यादेश देण्याची प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता मनपाकडून निधी शुक्रवारी उपलब्ध होणार असल्याने, आगामी दोन दिवसांतच मक्तेदाराला कार्यादेश देऊन या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
१. राज्य शासनालाही मनपाने पाठविला प्रस्ताव
२. शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा न करताच, मनपाकडून दिला जाईल निधी.
३. काम सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने मंजुरी मिळाल्यानंतर मनपाने दिलेला निधी महावितरण बिलांच्या माध्यमातूनही मनपाला करणार वर्ग
४. दीड कोटी रुपयांचा निधी मनपाने आधीच वर्ग केला असता, तर आजपर्यंत पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असते.