जळगाव : ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणासाठी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात ओबीसी आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली असून त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार कपिल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिंदे यांनी सांगितले की, गुरुवारी ओबीसींची एकत्रित समन्वय बैठक पार पडली. आरक्षणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण मिळावे, तसेच सध्या ओबीसींचे राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. या पुढच्या काळात नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणावरदेखील प्रश्न उभे राहू शकतात. त्यामुळे आता ओबीसींच्या आरक्षणासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला माजी आमदार राम हरी रुपणवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या आयोजनासाठी तालुकानिहाय बैठका सुरू असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला करीम सालार, एजाज मलिक, अशोक लाडवंजारी, ॲड. विजय पाटील, पंकज महाजन, संजय पाटील, फारुक शेख यांच्यासह ओबीसी समाजातील विविध नेते उपस्थित होते.