लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उतरता आलेख सुरू झाल्याचा दावा वारंवार केला जात आहे. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्हाभरात होणाऱ्या चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच रुग्णसंख्या देखील कमी होत आहे. असे असले तरी पॉझिटिव्हिटी रेट मात्र काही कमी होताना दिसत नाही. अजूनही पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांच्या आसपासच आहे.
एप्रिल महिन्यातील २८ दिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येने दररोज हजाराच्या वरचा टप्पा गाठला होता. त्यात फक्त दोनच दिवस कोरोना रुग्णसंख्या ९०० ते एक हजाराच्या मध्ये राहिली होती. त्यात बहुतेक वेळा प्रशासनाने फुल्ल टेस्टिंग केली होती. त्यातूनही बरेचसे रुग्ण समोर आले होते. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्या अचानक मोठ्या फरकाने कमी होऊ लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दररोजच्या रुग्णसंख्येचा आकडा हा ८०० च्या जवळपास आहे. असे असले तरी चाचण्यांची संख्या कमी झाल्याने देखील रुग्णसंख्येत फरक पडत असल्याचे समोर आले आहे.
पूर्वी जेथे पॉझिटिव्हिटी रेट हा १० ते १२ टक्क्यांच्या मध्ये होता, तोच रेट आता १० टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेटमध्ये आणि परिणामी संसर्गाच्या स्थितीत फारसा फरक नसल्याचे दिसून आले आहे.
आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह
अँटिजनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अहवाल जास्त पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआरचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. मात्र, त्या तुलनेने अँटिजन चाचणी ही सोपी असल्याने ही चाचणी सर्वांत जास्त केली गेली. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही वेळा दर दिवशी ९ हजारांपेक्षा जास्त अँटिजन चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातूनही बरेच बाधित समोर आले होते. मात्र, अँटिजनचा पॉझिटिव्हिटी रेट हा खूपच कमी आहे.
चाचणी संख्या व रुग्णसंख्या
१ एप्रिल
चाचणी संख्या -
९२०४
१३८७
रुग्णसंख्या
७ एप्रिल
११,२२१
१,१४१
१४ एप्रिल
६,९८६
९८४
२१ एप्रिल
१५,१०५
१,१४२
२८ एप्रिल
८,३१६
१,००६
१ मे
८,१७५
९३६
२ मे
६,१६५
९०४
३ मे
५,३६४
८०२
४ मे
८,३५३
८०८