जळगाव - शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या १० कोटींच्या निधीतील कामे पूर्वीच ठरलेली असल्याने जिल्हा नियोजन समितीतून १० कोटींचा विशेष निधी मिळावा, अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. महापौरांच्या मागणीला यश आले असून, पालकमंत्र्यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत १० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केल्याची माहिती नियोजन समिती सदस्य नितीन बरडे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांनी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन बरडे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.
फुले मार्केटमधील हॉकर्सवर मनपा दाखल करणार गुन्हे
जळगाव - शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास हॉकर्सला मज्जाव घातल्यावरदेखील याठिकाणी हॉकर्स आपले दुकाने थाटत आहेत. शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत फुले मार्केटमधील हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉकर्सचा माल लपविणाऱ्या दोन गाळेधारकांवरदेखील कारवाई मनपाच्या पथकाने केली असून, दोन्ही दुकाने मनपाने सील केली आहेत. तसेच अनेकवेळा सूचना देऊनही फुले मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर शनिवारी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
१० महिन्यांनंतर मनपात होणार लोकशाही दिन
जळगाव - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून मनपाकडून आयोजन होणाऱ्या लोकशाही दिनाचे आयोजन बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला असून, शासनानेदेखील नियमाप्रमाणे लोकशाही दिनाचे आयोजन करण्याचा सूचना शासकीय कार्यालयांना दिल्या आहेत. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या सोमवारी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अभय योजनेला मुदतवाढ द्या
जळगाव - मनपा प्रशासनाने मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीवर सूट देत हा भरणा भरण्यासाठी अभय योजना राबविली आहे. मनपाने ३१ जानेवारीपर्यंत शास्तीसह थकीत मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या करदात्यांना ७५ टक्के सूट दिली जाणार आहे. या योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुली चांगल्याप्रकारे वसूल होत आहे. त्यामुळे मनपाने ७५ टक्के सूटसाठीची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याची सूचना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी केली आहे. याबाबत सभापतींनी मनपा उपायुक्तांना पत्र पाठविले आहे.