बोदवड : काही नावांवर दोन शौचालयांची नोंद
गोपाळ व्यास
बोदवड : शेलवड येथील ३८० ग्रामस्थांच्या नावावर व्यक्तिगत शौचालयाची कागदोपत्री नोंद आहे. ज्या लाभार्थीच्या नावाने निधी हडप करण्यात आला, त्यापैकी एकाही लाभार्थीच्या घरानजीक शौचालय उभे राहिलेले नाही. इतकेच नाही तर काहींच्या नावांवर तर एक नाही दोन शौचालये दाखविण्यात आली आहेत.
तालुक्यातील शेलवड येथे १४ व १५ व्या वित्त आयोगातील स्वच्छ भारत अभियानात शौचालयासाठी निधी आला होता. यात मृत झालेल्या २७ जणांच्या नावाने शौचालयासाठी आलेला प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी काढण्यात आला. असाच ३८० ग्रामस्थांच्या नावावर असलेला निधीही हडप करण्यात आला.
या सर्व कागदपत्रांची छाननी आणि पाहणी करून निधी काढण्यास मंजुरी देण्यापर्यंतची जबाबदारी पंचायत समितीची असते. इथे मात्र सरळ-सरळ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. गावातील मृतांच्या टाळूवरील लोणी मग नेमके कोणी खाल्ले याबाबत आता एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. शौचालय बांधकामासाठी ग्रामपंचायतीने नेमलेला ठेकेदार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
या प्रकरणातील तक्रार व शेलवड ग्रामपंचायतीचे सदस्य दीपक माळी यांच्या मृत झालेल्या भावाच्या नावावर आलेले शौचालयाचे १२ हजार रुपयांचे अनुदान परस्पर काढून घेण्यात आले. दीपक यांच्या भावाचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. याशिवाय विद्यमान सरपंच समाधान बोदडे यांच्या नावावर आलेला घरकुल निधीचा अपहार झाला आहे. निधी मंजूर झाला त्यावेळी बोदडे हे ग्रामपंचायतीचे सदस्य नव्हते.
कोट
या प्रकरणात आपण एकटे जबाबदार नाही. यात शौचालयाचे बांधकाम करणारा ठेकेदार त्याचप्रमाणे तत्कालीन सरपंच व तत्कालीन विस्तार अधिकारी हेही तितकेच जबाबदार आहेत. यात आपण फक्त सह्या केल्या आहेत.
- संदीप निकम, निलंबित ग्रामसेवक