दीपनगर, ता. भुसावळ : दीपनगर वीजनिर्मिती विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर २१० मेगावॅट प्रकल्पासमोर राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने २२ जूनपासून साखळी उपोषणास सुरुवात केली. युनियनचे पदाधिकारी व कंत्राटी कामगार उपोषणाला बसले आहेत.
याबाबत राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने म्हटले आहे की, वीज केंद्रात काही दिवसांपासून ३५ वर्षांपूर्वीच्या व अनुभवी कंत्राटी कामगारांना सूचना न देता कामावरून कमी केले जात आहे. यामुळे कोरोनाकाळात कामगारांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवस्थापन वेळेत निविदा जाहीर न करता, कामगारांना त्यात सहभाग घेता येत नसल्यामुळे कंत्राटी कामगारांवर अन्याय होत आहे. या कामाच्या ठिकाणी अनुभव नसलेल्या कंत्राटी कामगारांना काम करण्यास सांगितले जाते.
माजी आमदार व शिवसेना नेते दिलीप भोळे यांनी उपोषण ठिकाणी कंत्राटी कामगारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा करून माहिती घेतली व मुख्य अभियंता यांनी यावर लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास कामगारांना आंदोलनास पाठिंबा दिला आहे व याविषयी ते वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे कामगारांना आश्वासन दिले.
याप्रसंगी युनियनचे सरचिटणीस अरुण दामोदर, प्रमोद कोलते, कृष्णा बऱ्हाटे, दिलीप पाटील व शेनफळ चौथे, संजय झांबरे, नीलेश फेगडे, शशिकांत जाधव, नारायण कोळी, गोपाळ ढाके, सोपान तायडे व कंत्राटी कामगार उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला वर्कर्स फेडरेशनने पाठिंबा दिला आहे.